शेंगोळा गावातील ४० वर्षीय तरुणाने घेतला गळफास
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन गावंडे हा जामनेर तालुक्यातील शेंगोळा गावाचा रहिवासी असून, काही काळापासून जळगावातील होलेवाडा परिसरात भाड्याने राहत होता. तो सराफ दुकानावर मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्याची पत्नी माहेरी गेलेली असल्याने तो घरात एकटाच राहत होता.
रविवार मध्यरात्रीच्या सुमारास गजाननने राहत्या घरात गळफास घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी बराच वेळ दरवाजा न उघडल्याने परिसरातील नागरिकांनी पाहणी केली असता घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच शनीपेठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविण्यात आला. आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शशीकांत पाटील हे करीत आहेत.









