हरिविठ्ठल नगरातील घटना
संदीप पाटील हा आई संगीता पाटील यांच्यासह राहत होता. मजुरी करून घरखर्च भागवणाऱ्या संदीपच्या वडिलांचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. सोमवारी घरात किरकोळ कारणावरून आई–मुलामध्ये वाद झाला. वादानंतर संदीप रागाने आपल्या खोलीत गेला, तर संगीता पाटील काही वेळासाठी घराबाहेर गेल्या.
काही वेळाने त्या परतल्यावर खोली आतून बंद असल्याचे त्यांना दिसले. बराच प्रयत्न करूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. दरवाजा उघडताच संदीपने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तातडीने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृताच्या पश्चात आई व मोठी बहिण असा परिवार आहे. पुढील तपास रामानंदनगर पोलीस करीत आहेत.









