जळगाव ( प्रतिनिधी ) – मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानादिवशी (२ डिसेंबर) जुने शहर भागात अचानक खळबळ उडाली. भाजप उमेदवारांच्या काही वाहनांना पोलिसांनी थांबवल्यानंतर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी थेट घटनास्थळी धाव घेत पोलिसांशी चर्चा केली. यावेळी काही मिनिटे तणावपूर्ण वातावरणात शाब्दिक चकमकही झाली.

मतदान सुरळीत सुरू असताना भाजप कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वाहनांना पोलिसांनी अडवले. ही माहिती मिळताच रक्षा खडसे त्या ठिकाणी पोहोचून पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारले. त्यावर खास बंदोबस्तासाठी पुण्याहून आलेल्या पोलीस पथकाने त्यांना स्पष्ट केले की, आदेशानुसारच वाहन तपासणी सुरू आहे आणि स्थानिक नेते कोण, याची माहिती त्यांच्याकडे नाही.
पोलिसांचे उत्तर ऐकून रक्षा खडसे यांनी वारंवार वाहन तपासणीमुळे होणाऱ्या अडचणींवर नाराजी व्यक्त केली. “नियम सर्वांसाठी सारखाच असावा. आमची वाहने थांबवत असाल तर इतरांचीही थांबवा,” असा त्यांनी स्पष्ट शब्दांत आग्रह धरला.
या घटनेनंतर काही काळ परिसरात तणाव वाढला; मात्र पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.









