जळगाव शहरातील खंडेराव नगर परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : विना परवाना वाळूची अवैधरित्या वाहतुक करणारे ट्रॅक्टरवर कारवाई करणाऱ्या ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांची कॉलर पकडून वाळूमाफियांनी त्यांच्या कानशिलात लगावली. तसेच शिवीगाळ करीत टॉमीने त्यांच्यावर हल्ला करीत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवार दि. १ रोजी दुपारी साडेतीन वाजता खंडेराव नगरात घडली.
राजू कडू बाऱ्हे (वय ५३) असे या तलाठ्याचे नाव आहे. या प्रकरणी वाळू माफिया मनोज रमेश भालेराव, फैजल खान आणि चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील पिंप्राळ्याचे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) म्हणून नियुक्तीस असलेले राजू बाऱ्हे हे खंडेराव नगराकडून तलाठी कार्यालयाकडे जात होते. यावेळी गणपती मंदिराजवळून त्यांना विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाळूचा उपसा होत असल्याचे दिसले. त्यांनी वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर थांबवून चालकाकडे परवान्याबाबत विचारणा केली.
यावेळी ट्रॅक्टरच्या मागून दुचाकीवरुन यापुर्वी वाळू वाहतुकीची कारवाई केलेला मनोज भालेराव हा त्याचा मित्र फैजल याच्यासोबत तेथे आला. त्याने तुमचे नेहमीचेच झाले आहे हे ट्रॅक्टर माझेच असून यापुर्वी देखील जमा केले होते असे म्हणत त्याने बुवा म्हणत ट्रॅक्टर घेवून जाण्यास सांगितले. ग्राम महसूल अधिकारी बाऱ्हे हे ट्रॅक्टरला आडवे होवून ट्रॅक्टर अडवित असतांना मनोज भालेराव हा त्यांच्या अंगावर धावून गेला. त्याने बाऱ्हे यांची कॉलर पकडून त्यांच्या कानशिलात लगावली आणि त्यांना ढकलून दिले. तसेच जोरजोरात अश्लिल शिवीगाळ देखील करु लागला.
ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्यानंतर वाळू माफिया भालेराव याने त्याच वेळेस तुला मारुन टाकायला पाहिजे होते. असे म्हणत फैजल खान याला टॉमीने मारण्यास सांगितले. त्यानुसार फैजल याने बाऱ्हे यांच्यावर टॉमीने हल्ला केला. परंतू बाऱ्हे हे बाजूला सरकल्यामुळे चालक ट्रॅक्टर घेवून पसार झाला. ही घटना घडल्यानंतर ग्राम महसुल अधिकारी हे सहकाऱ्यांना फोन करुन सांगत असतांना, त्याठिकाणी नागरिकांनी गर्दी होत असल्याचे दिसताच वाळू माफिये तेथून पसार झाले. ग्राम महसूल अधिकारी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन संशयित मनोज सुरेश भालेराव, फैजल खान व ट्रॅक्टर चालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









