डॉ. परिक्षीत बाविस्कर यांच्या उमेदवारीने राजकारण तापले
अमळनेर ( प्रतिनिधी ) – नगरपरिषदेसाठी यंदा अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी नवे राजकीय गणित तयार झाले असून शिवसेना (शिंदे गट) तर्फे डॉ. परिक्षीत श्रीराम बाविस्कर यांच्या नावाची अधिकृत घोषणा होताच या निवडणुकीत नवचैतन्य निर्माण झाले आहे. आधी काहीसे एकतर्फी वाटणारे चित्र आता धमाकेदार स्पर्धेकडे झुकत असून मतदारांच्या चर्चांना वेग आला आहे. कासार गल्लीतील इच्छादेवी चौकात जन्मलेले आणि नवोदय विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतलेले डॉ. बाविस्कर हे अभ्यासू, कर्तबगार आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सेवेने लोकप्रिय ठरलेले व्यक्तिमत्त्व मानले जाते. त्यांच्या कुटुंबातील कै. श्रीराम बाविस्कर आणि प्रल्हाद बाविस्कर यांच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी जपलेला असून कोरोना काळातही त्यांनी धैर्याने सेवा केली. गावाशी नाळ घट्ट ठेवणाऱ्या बाविस्कर परिवाराची प्रामाणिकपणा व सामाजिक कार्यासाठी ओळख असल्याने २२ घरांच्या या मोठ्या कुटुंबातून उमेदवार पुढे आल्याचे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण आहे. नगरपरिषदेसमोरील पाणीपुरवठा, करप्रणाली, रस्ते, स्वच्छता या प्रमुख अडचणींच्या पार्श्वभूमीवर सुशिक्षित नेतृत्व मिळावे, या अपेक्षेचा आधार वाढत असून माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या व्यूहरचनेमुळे डॉ. बाविस्कर यांच्या विजयाबाबत समर्थकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
अमळनेर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, सुरुवातीला लोकनियुक्त उमेदवार जितेंद्र ठाकूर आणि शिवसेना (शिंदे गट) चे डॉ. परिक्षीत बाविस्कर यांच्यात चुरशीचा सामना असल्याची चर्चा होती. मात्र आता या दोघांच्या संघर्षात तिसरे नाव जोरात पुढे आले असून राजकीय वातावरणाला नव्या वळणाची दिशा मिळत आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कडून राधाबाई संजय पवार,या अनुभवी सामाजिक कार्यकर्त्या पुन्हा नगराध्यक्ष पदाच्या चर्चेत पुढे सरसावत आहेत. पूर्वी नगरसेविका राहिलेल्या आणि अनेक वर्षे सामाजिक कामात सक्रिय असलेल्या राधाबाई यांच्या नावाने समर्थकांमध्ये नवचैतन्य दिसून येत आहे.









