जामनेर–पहूर मार्गावर भीषण अपघात; परिसरात शोककळा
जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर–पहूर रस्त्यावरील पिंपळगाव गोलाईजवळ मंगळवारी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून ट्रक चालक गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी हलविण्यात आला आहे. वेगात येणाऱ्या दुचाकी आणि ट्रकची झालेली समोरासमोर धडक इतकी प्रचंड होती की घटनास्थळी काही क्षणांतच हाहाकार माजला.
या अपघातात अतुल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश समाधान लोखंडे, अजय (वय 25) – तिघेही रा. जामनेर) आणि रवींद्र सुनील लोंढे (रा. पहूर) या २२ ते २४ वयोगटातील चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांची हाडे आढळून आली आहेत; ती कुठून कुठे नेली जात होती. याबाबत मात्र अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. तसेच जखमी चालकाची ओळख रात्री उशिरापर्यंत निश्चित होऊ शकली नव्हती.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे, गोपाळ माळी, जीवन चव्हाण आणि ईश्वर कोकणे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी पहूरचे सरपंच अब्बू तडवी आणि ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील हेही तिथून जात असताना थांबून जखमी चालकाला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली.
चारही मृतदेह रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईक आणि गावकऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती. अचानक घडलेल्या या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.









