पातोंडा येथील दुर्दैवी घटना ; गावात शोककळा
अमळनेर (प्रतिनिधी)- पातोंडा गावात शेतातील मका काढणीदरम्यान थ्रेशर मशीनमध्ये रुमाल अडकल्याने नितीन सुरेश बिरारी ( वय 36 ) या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने गाव हादरले आहे. नांद्री शिवारात मक्याची काढणी सुरू असताना अचानक गळ्यातील रुमाल मशीनच्या ब्लोअरमध्ये खेचला गेल्याने काही क्षणांतच नितीन कोसळला. तातडीची मदत म्हणून त्याला अमळनेरच्या नर्मदा मेडिकल फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले, मात्र शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनास्थळी मका काढणीचे काम सुरू असताना उपस्थित लोक क्षणभर गोंधळून गेले होते. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. मृत नितीनच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन लहान मुले असून घरातील कर्त्या पुरुषाच्या आकस्मिक जाण्याने पातोंडा गावात शोककळा पसरली आहे.









