जिल्हा परिषद जळगाव : नाविन्यपूर्ण उपक्रम बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा परिषद म्हणजे केवळ कागदपत्रांचा ढिगारा नसून ती एक “मिनी मंत्रालय” आहे. जनतेच्या आशा-आकांक्षांचा दृढ किल्ला असून हा किल्ला आज अधिक सक्षम होत आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित नाविन्यपूर्ण उपक्रम बक्षीस वितरण समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी डाएटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, प्रकल्प संचालक राजू लोखंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे, एम. बा. क.चे हेमंतराव भदाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव, सुनिल पाटील, कॅफो विनोद चावरिया, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर, पाचोरा गट विकास अधिकारी सुधाकर मुंढे, डी. जी. जाधव, के. पी. वानखेडे यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपशिक्षक योगेश इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी मानले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले,
“जिल्हा परिषद म्हणजे फक्त योजना राबवणारी यंत्रणा नाही तर शासन आणि सामान्य जनतेमधील विश्वासाचा दुवा आहे. ‘ही दिवाळी नवी घरी’ उपक्रमातून अनेक कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले. बेघरांच्या डोक्यावर छप्पर देणे ही केवळ शासकीय जबाबदारी नसून ती सामाजिक जवाबदारी आहे. केवळ ISO मिळविणे हे उद्दिष्ट नसून पारदर्शक, शिस्तबद्ध आणि लोकाभिमुख कारभार हीच खरी ओळख ग्रामपंचायतींची असली पाहिजे. मानवतेने चालणारे प्रशासन असेल तर विकास आपोआप वेग घेतो.

कार्यक्रमात १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या ३५ ग्रामपंचायती तसेच ISO मानांकन प्राप्त ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला. ‘निपुण जळगाव’ उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षक व अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. ‘मिशन दृष्टी’ अंतर्गत विद्यार्थ्यांना चष्मा वितरण करून त्यांच्या जीवनात नवी दृष्टी देण्यात आली. राष्ट्रीय पोषण माह अभियानांतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कार्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ अनिल झोपे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी निपुण भारत उपक्रमाची माहितीपट प्रदर्शित करण्यात आली तसेच राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत पाककलेचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले. तब्बल १९ स्टॉल्सना पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व मान्यवरांनी भेट देऊन माहिती घेतली. विविध आकर्षक रांगोळ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. महिला व बालकल्याण विभागामार्फत ‘खानदेश का मेवा’ या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी प्रास्ताविकात सांगितले की जिल्हा परिषदेमध्ये विविध विभागांनी समन्वयाने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळेच राज्यस्तरावर गौरवास्पद यश मिळाले आहे. पुढील काळातही नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून विकासाचा वेग कायम ठेवण्यात येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.









