8 जणांचा मृत्यू; दिल्लीसह मुंबईत ‘हाय अलर्ट’ जारी
नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – लाल किल्ला परिसरात झालेल्या एका भीषण स्फोटाने राजधानी दिल्ली हादरली आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक बाहेरील पार्किंगमध्ये हा मोठा स्फोट झाला, ज्यात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून 24 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.


लाल किल्ला मेट्रो स्टेशन, गेट नंबर 1 पार्किंग जवळ आज संध्याकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी. एका इको व्हॅनमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
स्फोटानंतर परिसरात मोठी आग लागली, ज्यात अनेक गाड्या जळून खाक झाल्या. गाड्यांचे केवळ सांगाडे उरले असून परिसरात गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. स्फोटाच्या आवाजाने परिसरातील दुकानांच्या आणि अनेक वाहनांच्या काचा फुटल्या. या स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, हा आकडा वाढण्याची भीती आहे. यात 24 जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने एलएनजीपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीसह मुंबईतही ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हा दहशतवादी हल्ला होता की अन्य काही, याबाबत तपास सुरू आहे. पोलिसांनी फरीदाबादमध्ये केलेल्या कारवाईनंतर ही घटना घडल्यामुळे दहशतवादी कटाची शक्यताही वर्तवली जात आहे.

पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि कसून तपास करत आहेत.पोलिसांनी तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवून संपूर्ण परिसर निर्मनुष्य केला आहे.नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या भीषण घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आणि विविध सुरक्षा यंत्रणांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे.









