जळगाव शहरातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील मेहरुण परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आज दुपारी चार वाजेच्या सुमारास क्रिकेट खेळण्यावरून दोन गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होत दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. या दगडफेकीत तीन ते चार तरुण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


क्रिकेट खेळणारे हे तरुण तांबापुरा परिसरातील गवळी वाडा आणि बिलाल चौक येथील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अचानक उसळलेल्या या गोंधळामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. जखमींना तात्काळ जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक निरीक्षक अनिल वाघ, गणेश वाघ, पीएसआय चंद्रकांत धनके आणि अशोक काळे यांच्यासह दंगा नियंत्रण पथकाचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवून परिसरात शांतता प्रस्थापित केली.









