अमळनेर तालुक्यातील सारबेटे येथील घटना
अमळनेर प्रतिनिधी : बाहेरगावी गेलेल्या घरमालकाचे घर फोडून व शेजारच्या घरातून सोन्या, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण २ लाख ३३ हजारांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना २९ रोजी पहाटे १ ते ५ दरम्यान सारबेटे खुर्द येथे घडली. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सारबेटे खुर्द येथील भीमराव पुना पाटील (वय ६४) हे भडगाव येथे आपल्या व्याहीकडे भेटायला गेले होते. दिनांक २९ रोजी सकाळी ६ वाजता त्यांचा पुतण्या नितीन पाटील यांनी फोन करून त्यांना तुमच्या घराचा आणि गावातील भालचंद्र मूलचंद पाटील यांच्या घराचा कडीकोयंडा तोडलेला आहे, असे सांगितले. त्यानंतर भीमराव पाटील यांनी घरी येऊन पाहिले असता, त्यांच्या कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त झालेले होते.
तर ६८ ग्रॅमची चैन, पोत, अंगठी, टोंगल, किल्लू असे सोन्याचे दागिने, तर २९ भारचे चांदीचा करदोडा, वाळा, कमरपट्टा, देवीची मूर्ती व रोख १५ हजार रुपये तर भालचंद्र मूलचंद पाटील यांच्या घरातील ६ ग्रॅमच्या बाळ्या असा एकूण २ लाख ३३ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यानी चोरून नेला आहे. घटनेचे वृत्त कळताच डीवायएसपी विनायक कोते, पो.नि. दत्तात्रय निकम, पो.उ.नि. नामदेव बोरकर, पो.उ.नि. रामकृष्ण कुमावत, मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, उदय बोरसे, लक्ष्मीकांत शिंपी यांनी भेट देऊन पंचनामा केला. सोबत ठसे तज्ज्ञांनी काही ठिकाणचे ठसे घेतले. चोरट्यांनी घरातील एक पेटी शेतात नेऊन त्यांच्यातील दागिने काढून साहित्य शेतात फेकून पोबारा केला. चोरटे शेतातूनच आले आणि शेतातून निघून गेल्याचे त्यांच्या मातीच्या पावलांवरून दिसून आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो.उ.नि. रामकृष्ण कुमावत करत आहेत.









