चोपडा तालुक्यात अडावद येथील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : टरबूजाने भरलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अडावद येथील वडगाव रस्त्यावर घडली. दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून पसार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

आकाश ज्ञानेश्वर पाटील (रा. इंदिरानगर प्लॉट, अडावद) असे मयत तरुणाचे नाव आहे. आकाश हा गरीब कुटुंबातील होतकरू तरुण असून, तो वडिलांच्या गॅरेज दुकानात मदत करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि कुटुंबीय असा मोठा परिवार आहे.राजस्थानमधून आलेला ट्रक (क्रमांक आरजे ४० जीए ४१९६) हा चांदसणी पो. कमळगाव, वडगाव येथील शेतातून टरबूज भरून अडावदकडे येत होता. दुपारी सुमारास वडगाव रस्त्यावरील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर हा ट्रक दि. ३० ऑक्टोबर गुरुवार रोजी दुपारी भरधाव वेगात असताना समोरून येणाऱ्या बजाज दुचाकी (क्रमांक एमएच १९ एन ५९७९) ला जोरदार धडक दिली. अपघातात आकाश पाटील जागीच ठार झाला. अपघाताच्या वेळी तो जेवणासाठी घरी परतत होता. त्याच्या निधनाने अडावद परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघाताची माहिती मिळताच अडावद पोलिस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल शेषराव तोरे, सुनील तायडे, किरण शिरसाठ, फिरोज तडवी, भूषण चव्हाण, प्रदीप पाटील, जयदीप राजपूत, विजय बच्छाव, अक्षय पाटील आणि दिलीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आणि मृतदेहाचा पंचनामा करून तो चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.









