भुसावळ शहरातील सत्यसाई नगर येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : येथील सत्य साई नगर येथे एका तरुणाच्या दुचाकीला खाली पाडून त्याच्याकडील तब्बल २५ लाख रुपयांची बॅग घेऊन तिघांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना दि. २८ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजून २० मिनिटांनी घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद यासीन मोहम्मद ईस्माईल (वय ३९ वर्ष, रा. सत्यसाई नगर, खडका रोड भुसावळ) यांनी फिर्याद दिली आहे. दि. २८ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यासिन हे त्यांची दुचाकी (एमएच १९ बीसी ५५८६) ने ऑफिसमधून घराकडे जात होते. तेव्हा सत्य साई नगर परिसरात अज्ञात तीन इसमांनी त्यांच्या दुचाकीला धक्का देऊन खाली पाडले. तेव्हा त्यांच्याताब्यातील निळी चौकोनी थैली ज्यात २५ लाख रुपये व ऑफिसचे ४२ हजार रुपये असे २५ लाख ४२ हजार रुपये तिघांनी बळजबरीने हिसकावून नेली. याप्रकरणी तातडीने मोहम्मद यासिन यांनी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड हे करीत आहे.
*









