सराईत तिघांना न्यायालयीन कोठडी
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला त्याच्या दोन साथीदारांसह एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दहशत माजवण्याच्या उद्देशाने घातक शस्त्रे बाळगून फिरत असलेल्या या त्रिकुटाकडून पोलिसांनी गावठी बनावटीचा कट्टा, जिवंत काडतूस आणि धारदार कोयता जप्त केला आहे.

जळगाव शहर कांचन नगर परिसरात राहणारा सराईत गुन्हेगार तेजस दिलीप सोनवणे (वय २५) याला उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र, हद्दपारीचा आदेश धुडकावून तेजस सोनवणे त्याच्या साथीदारांसह घातक हत्यारे घेऊन नेहरू नगर परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती २५ ऑक्टोबर २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली.
माहितीची खात्री होताच, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले. या पथकात सफौ विजयसिंग पाटील, पोहेकाँ गणेश शिरसाळे, पोहेकाँ प्रमोद लाडवंजारी, पोहेकाँ किरण चौधरी, पोकॉ गणेश ठाकरे, पोकॉ किरण पाटील, पोकॉ नितीन ठाकुर, पोकॉ राहुल घेटे आणि पोकॉ योगेश घुगे यांचा समावेश होता.
या पथकाने तात्काळ शिरसोली रोडवरील नेहरू नगर भागातील संदीपनी बॉईज हॉस्टेल परिसरात सापळा रचला. संशयास्पद हालचाल करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यांनी त्यांची नावे तेजस दिलीप सोनवणे (वय २५, रा. कांचन नगर, जळगाव), खुशाल पितांबर सोनार (वय २१, रा. पार्वताबाई ओकनगर, कांचन नगर, जळगाव) आणि चेतन पितांबर सोनार (वय २३, रा. पार्वताबाई ओकनगर, कांचन नगर, जळगाव) अशी सांगितली.
झडतीदरम्यान, हद्दपार असलेला आरोपी तेजस सोनवणे हा आदेशाचे उल्लंघन करताना आढळला. तसेच, त्याचा साथीदार खुशाल सोनार याच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. तिसरा आरोपी चेतन सोनार याच्याकडे धारदार पाते असलेला लोखंडी कोयता आढळून आला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन ही घातक शस्त्रे जप्त केली.
तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे आणि पोकॉ चेतन पाटील हे करीत आहेत. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली.









