रामानंदनगर पोलिसांचे “अर्थ”पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप
(विशेष प्रतिनिधी)
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील रामानंद नगर परिसरात असलेल्या गिरणा टाकीजवळ रोज सकाळी व संध्याकाळी मद्यपी लोकांची गर्दी होत असल्याने महिला व मुलींना त्रास होत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. या परिसरात रामानंद नगर पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने, तसेच अनेकवेळा पोलीस कर्मचारी ये-जा करतात. मात्र कोणालाही हटकत नसल्याचे चित्र असल्याने नागरिकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे.

गिरणा टाकी परिसरात २ ते ३ मद्याची दुकाने आहेत. या दुकानातून बियर, दारू घेतल्यावर मद्यपी मंडळी हे आजूबाजूला असलेल्या मोकळ्या जागेत, रस्त्यावर एका कडेला रिक्षा लावून त्यात दारू पित बसतात. तसेच, तेथे अनेकदा गोंधळहि घालतात. या परिसरात उच्चभ्रू लोक राहतात. येथे मोकळ्या जागेत भाजीबाजार भरतो. तेथे भाजी घेण्यासाठी महिला, मुली येत असतात. तसेच, महाविद्यालय परिसर असल्याने अनेक मुली खोली घेऊन गिरणा टाकी परिसरात राहत आहेत. त्यांना भाजी व आजूबाजूच्या इतर दुकानात वस्तू घेण्यासाठी आल्यावर मद्यपींचा गोंधळ पाहायला मिळत असतो.
या प्रकाराकडे आजवर रामानंद नगर पोलिसानी दुर्लक्ष केल्याचा इतिहास आहे. तत्कालीन डीवायएसपी निलाभ रोहन यांनी नागरिकांच्या तक्रारीवरून काही वर्षांपूर्वी थेट कारवाई करून मद्यपींना दम दिला होता. मात्र त्यानंतर कारवाई शून्य आहे. पेट्रोलिंग करणारे व परिसरातून ये-जा करणारे कर्मचारीदेखील याकडे दुर्लक्ष करीत आहे. काही नागरिकांनी तर “केसरीराज”कडे तक्रारी करून, रामानंदनगर पोलिसांचे “अर्थ”पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. पोलीस दलातील वरिष्ठ पोलिसांनी या प्रकाराकडे लक्ष द्यावे. शक्य झाल्यास दारू दुकाने येथून हलवावीत, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.









