किशोरअप्पांच्या भावनांचे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून समर्थन, वरिष्ठ नेत्यांची मात्र अडचण !
(विशेष प्रतिनिधी)
जळगाव : सध्या जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील राजकीय घमासान जोरात सुरु आहे. यात पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आ. किशोर पाटील यांनी तर महायुतीऐवजी स्वबळावर लढण्याचे घोषित केले आहे. तर किशोरअप्पांच्या भूमिकेबाबत आता भाजप-शिवसेनेत तणाव निर्माण झालाय. मात्र किशोरअप्पानी घेतलेला निर्णय वरिष्ठ नेत्यांना का पटत नाही ? तसेच, काही वरिष्ठांना घराणेशाहीच का हवी आहे असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आणि भाजपचे नेते गिरीश महाजन हे मात्र सध्या सावध भूमिका घेताना दिसत आहे.


पाचोरा नगराध्यक्षपदासाठी व प्रभागासाठी आरक्षण निघाले आहे. तसेच, भडगाव नगराध्यक्षपदासाठी देखील आरक्षण निघाली आहे. पाचोरा नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलाकरीता तर भडगाव नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमाती महिलाकरिता राखीव आहे. पाचोरा नगरपालिकेतील प्रभागातील आरक्षणदेखील जाहीर झालेले आहे. त्यामुळे आता सर्व पक्षांमध्ये शिवसेना शिंदे गट हा व्यूहरचना करण्यात आघाडीवर आहे. काही कार्यकर्त्यांना तर उमेदवारीदेखील जाहिर करण्यात आल्याचे चित्र सोशल मीडियातील चर्चेत दिसत आहे. यामुळे पाचोरासह भडगाव मतदारसंघ हा जिल्ह्यात चर्चिला जात आहे.
दुसरीकडे राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात महायुती आहे. मात्र पाचोरा येथे शिवसेनेचे नेते आ. किशोर पाटील यांनी वेगळी चूल मांडली आहे. ज्या उमेदवारांनी विधानसभेत आ. किशोर पाटील यांच्याविरोधात आव्हान दिले अशा चौघांना शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपाने पक्षप्रवेश दिला. त्यामुळे या चौघांसोबत मी कसे युती म्हंणून काम करू ? असा सवाल आ. किशोर पाटील यांनी विचारला आहे. यात शिवसेना ठाकरे गटातून वैशाली सूर्यवंशी, स्वराज्य पक्षाकडून प्रताप हरी पाटील, अपक्ष म्हणून अमोल शिंदे तर अपक्ष म्हणूनच दिलीप वाघ यांनी किशोर पाटील यांच्याविरोधात लढत दिली होती. आता हे चौघे काळाची पावले ओळखून भारतीय जनता पक्षात शिरले असून त्यांना भाजपच्या नेत्यांनी प्रवेशही दिला आहे.

चौघांनाही मात्र नगरपालिका, जिल्हा परिषदेचे वेध लागले आहे. तिकिटासाठी त्यांनी वरिष्ठांकडे लॉबिंग सुरु केली आहे. आता भाजप-सेना युती झाली तर मात्र या चौघांचा प्रचार मी कसा करू, ज्यांनी विधानसभेत माझ्याविरुद्ध कारस्थान करून मला हरविण्याचा प्रयत्न केला, असे आ. किशोर पाटील यांचे म्हणणे आहे. या भूमिकेचे पाचोरा भडगाव मतदारसंघातून सर्वत्र स्वागत होत असून केवळ स्वार्थाकरिता दलबदलूपणा करणाऱ्या व्यक्तींच्या सोबत राहण्यात अर्थ नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना कार्यकर्त्यांनी दिली आहे. त्यामुळे आ. किशोर पाटील यांनी आता दंड थोपटले असून आगामी काळात आ. किशोर पाटील यांच्या भूमिकेचे काय होणार याकडे लक्ष लागून आहे.









