पारोळा तालुक्यात बायपास महामार्गावरील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पारोळा बायपासवर पंचर झालेल्या ट्रकची दुरुस्ती करत असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने दोन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता घडली. मृत व्यक्तींपैकी एक जण गुजरात तर दुसरा चंद्रपूरचा रहिवासी आहे. पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीरेंद्र पतितपावन खोब्रागडे (वय-५२, रा. चंद्रपूर) आणि विभाभाई करसनभाई रबारी (वय-६२, रा. कच्छ-भुज, गुजरात) अशी अपघातात मयत झालेल्यांची नावे आहेत. १२ चाकी (जीजे १२ बीएक्स ९३३२) क्रमांकाच्या ट्रकचे चाक पंचर झाल्यामुळे क्लीनर वीरेंद्र खोब्रागडे आणि विभाभाई रबारी हे पारोळा बायपासवरील वळणावर ट्रक रस्त्याच्या कडेला लावून पंचर काढण्याचे काम करत होते. यावेळी चंद्रपूर येथील रहिवासी असलेल्या आमिर खान अहमद खान (वय-३५) हा ट्रक क्रमांक (एमएच ३४ सीक्यू ०७१७) भरधाव वेगाने घेऊन आला आणि त्याने उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, पंचर काढणाऱ्या दोघांनाही गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ट्रकचालक निलेश जैन यांच्या फिर्यादीनुसार, अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालक आमिर खान अहमद खान याच्या विरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.