अमळनेर येथील सिनेस्टाईल घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : वृद्धाकडील ५० हजार रुपयांची बॅग हिसकावून पळणाऱ्या अल्पवयीन मुलाला एका तरुणाने झडप सिनेस्टाईल घटना अमळनेरच्या पैलाड भागात सोमवारी दुपारी एक वाजता घडली. दुसरा संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
पैलाड येथील तुकाराम भोई यांनी सोमवारी दुपारी बडोदा बँकेतून पन्नास हजार रुपये काढले. मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये पैसे ठेवून घराकडे निघाले असता दोन अल्पवयीन मुलांनी एका दुचाकीने त्यांचा पाठलाग सुरू केला. घरानजीक पोहचल्यावर भोई हे दुचाकीच्या डिक्कीमधून पैसे काढत असताना, अल्पवयीन मुलाने त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये हिसकावून पळ काढला. त्यांनी आरडाओरड केली त्यावेळी जवळच असलेल्या रोहित भागवत पाटील याने प्रसंगावधन राखत या मुलाला पकडले आणि त्याच्या हातातील पैसे तुकाराम भोई यांना परत केले. हे पाहताच दुसरा मुलगा तिथून पळाला. रोहितने या मुलाला अमळनेर पोलीस स्टेशनच्या पोकॉ. मंगल भोई व विनोद भोई यांच्या ताब्यात दिले.