महिलांच्या सुरक्षेसाठी साकळी ग्रामपंचायतीचा नावीन्यपूर्ण उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतीने गावकरी बांधव आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी “ALERTO SOS” हे आधुनिक मोबाईल ॲप विकसित केले आहे.या ॲपच्या माध्यमातून संकटाच्या प्रसंगी केवळ एका क्लिकवर मदत मिळवता येते. ॲपद्वारे दिलेल्या आपत्कालीन संपर्क क्रमांकावर सायरन वाजवता येतो. लोकेशन शेअर करता येते. व्हॉईस मेसेज पाठवून मदत मागवता येते.
राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामविकासासोबतच सुरक्षित, सशक्त आणि डिजिटल गाव घडविण्यावर भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेनुसार जळगाव जिल्ह्यात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याच अनुषंगाने यावल तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतीने गावकरी बांधव आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी “ALERTO SOS” हे आधुनिक मोबाईल ॲप विकसित केले आहे.
या ॲपमध्ये वापरकर्त्यांना ३ नातेवाईकांचे नंबर आपत्कालीन संपर्क म्हणून नोंदविण्याची सुविधा असून, त्यांना तात्काळ लोकेशन, एसएमएस आणि नोटिफिकेशनद्वारे माहिती पाठविण्याची सोय आहे. तसेच, २ कम्युनिटी ग्रुप्सना एकाचवेळी मेसेज पाठविण्याची सुविधाही उपलब्ध आहे. याशिवाय, 112, 100, 109, 108, 139, 1033, 1091, 1098, 1930 या हेल्पलाइन क्रमांकांवर थेट मदत मागवण्याची सुविधा देखील ॲपमध्ये आहे. बालसुरक्षेसाठी या ॲपमध्ये विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत.
पालकांना मुलांच्या मोबाईलवरील ब्राउझर सर्च हिस्टरी पाहण्याची, अभ्यासाच्या वेळापत्रकानुसार अलार्म सेट करण्याची आणि सोशल मीडियावरील चॅटिंगवर देखरेख ठेवण्याची सुविधा ॲपमधून मिळते. विशेष म्हणजे SOS बटण दाबल्यानंतर एक तासापर्यंत जीपीएस ट्रॅकिंग सुरू राहते, ज्यामुळे संकटात असलेल्या व्यक्तीचे अचूक ठिकाण नातेवाईक तत्काळ ट्रॅक करू शकतात. साकळी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम ग्रामीण भागातील महिला व बालसुरक्षेसाठी एक आदर्श ठरू लागला असून, डिजिटल ग्रामसुरक्षेच्या दिशेने हे एक नव्या युगाचे पाऊल असल्याचे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.