धरणगाव तालुक्यातील चोरगाव येथे दारू दुकानाची तोडफोड, संतप्त नागरिकांचे आंदोलन
जळगाव (प्रतिनिधी) :- धरणगाव तालुक्यातील चोरगाव येथे गुरुवारी दि. ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता दारूच्या दुकानाजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. विषारी दारूमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी आणि नातेवाईकांनी जोरदार आंदोलन केले. दरम्यान तरूणाला मारहाण करून त्याला ठार केल्याचा आरोप करत दोषींना अटक करण्यात यावी अशी मागणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी केली आहे. याबाबत धरणगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हिरालाल अशोक सोनवणे (वय ३५, रा. चोरगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. हिरालाल सोनवणे याने चांदसर शिवारात असलेल्या गावठी दारू विक्रेत्याकडे जावून गुरूवारी ९ ऑक्टोबर रोजी दुपारी दारू पिली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता त्याचा मृतदेह दारूच्या दुकानासमोर मिळून आला. याची माहिती मिळताच नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती., दरम्यान यावेळी संतप्त नातेवाईकांनी दारू विक्रेत्याच्या दुकानाची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आला होता. हा प्रकार घडल्यानंतर धरणगाव आणि पाळधी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह हलवण्यास नागरिकांनी मज्जाव केल्याने घटनास्थळी मोठा संघर्ष निर्माण झाला. यापूर्वीच्या मृत्यूंसाठीही याच अवैध दारूला जबाबदार धरले जात असल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला होता. पोलीस प्रेत उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यास गेले असता, नागरिकांनी त्यांना रोखले. ‘विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही,’ अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली. यावेळी नागरिकांनी रस्ता जाम करून जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान या गावातील नागरिकांनी यावेळी गंभीर आरोप करत, गेल्या सहा महिन्यांत याच अवैध गावठी दारूमुळे सुमारे १५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यावरून स्थानिक अवैध दारूविक्री किती गंभीर बनली आहे, हे स्पष्ट होते. पोलीस अधिकारी कंडारे यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिक आपल्या मागणीवर ठाम होते. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मयत तरूणाच्या नातेवाईकांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गोंधळ घातला. दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यात येणार नाही असा पवित्रा घेतला होता. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.