जिल्हा पोलीस दलाची कारवाई : हद्दपार आरोपी, वॉरंटमधील ७ आरोपींना अटक
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात आगामी सण-उत्सव आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार दि. ०९ रोजी पहाटे ०४ ते ०८ वाजेदरम्यान अचानकपणे कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. शहरातील ८४ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांना समज देऊन सोडण्यात आले.
शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जळगाव शहरातील रेकॉर्डवरील एकूण ३९४ आरोपींना तपासणीसाठी या ऑपरेशनचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासह ७ पोलीस निरीक्षक, १५ पोलीस अधिकारी आणि ३१४ पोलीस अंमलदार असे मोठे पथक नियुक्त करण्यात आले होते. पोलीस पथकांनी शहराच्या विविध भागांमध्ये एकाचवेळी कॉम्बिंग केली: एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत रामेश्वर कॉलनी, मास्टर कॉलनी, कासमवाडी, तुकारामवाडी, तांबापुरा, कंजरवाडा इत्यादी भागात शोधमोहीम राबविली. शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत कांचननगर, विठ्ठलपेठ, डॉ. आंबेडकर नगर, गोपाळपुरा, कोळीपेठ, मेस्कोमातानगर, गुरुनानक नगर, शनिपेठ गवळीवाडा, ज्ञानदेव नगर, दाळफळ, तळेले कॉलनी, शंकर अप्पा नगर तसेच जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत शिवाजी नगर, गेंदालाल मिल, राजमालती नगर, शाहुनगर, रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत राजीव गांधी नगर, समतानगर, महाबळ, पिंप्राळा हुडको, आझादनगर, खंडेराव नगर, पिंप्राळा, हरिविठ्ठल नगर या ठिकाणी तपासणी करण्यात आली.
या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये २७६ रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यात आले, ज्यात ८४ आरोपी मिळून आले. या ८४ आरोपींना शांतता राखण्याबाबत सक्त समज देऊन सोडण्यात आले. मिळून आलेल्या आरोपींपैकी गंभीर कारवाईमध्ये जळगाव शहर पो.स्टे. हद्दीतील २ हद्दपार आरोपी आणि एमआयडीसी पो.स्टे. हद्दीतील १ हद्दपार आरोपी मिळून आले. यातील तिघांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ तसेच आर्म अॅक्ट कलम ४/२५ नुसार कारवाई करण्यात आली. न्यायालयाने काढलेल्या ७ अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपींना अटक करण्यात आली आहे. भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला १ आरोपी मिळून आला, त्याला भुसावळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.