जळगाव लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची शहरात कारवाई
अटकेतील आरोपींमध्ये रिंगणगावचे सरपंच भानुदास पुंडलिक मते (वय ४५, रा. खोंडेवाडा, ता. एरंडोल), सदस्य पती समाधान काशीनाथ महाजन (वय ३८, रा. युनियन बँकेजवळ, एरंडोल) आणि खाजगी पंटर संतोष नथ्थू पाटील (४९, रा. कल्याणेहोळ, ता. धरणगाव) यांचा समावेश आहे. या कारवाईने रिंगणगाव ग्रामपंचायतीत खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेतील सुमारे १ कोटी ५० लाख २३ हजार ३२१ रुपयांचे काम पूर्ण केले होते. त्यापैकी १ कोटी २७ लाख २३ हजार ३२१ रुपये इतकी बिलाची रक्कम मिळाली असून २३ लाख रुपये प्रलंबित होते. संबंधित योजनेचे काम ताब्यात घेण्यासाठी आवश्यक असलेला करारनामा अपूर्ण असल्याने देयक थांबले होते.
या संदर्भात ६ ऑक्टोबर रोजी सरपंच भानुदास मते आणि ग्रामपंचायत सदस्य पती समाधान महाजन यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी करारनामा हस्तांतरणासाठी १ लाख रुपयांची लाच मागितली, मात्र शेवटी ८० हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली. या प्रकरणाची तक्रार ७ ऑक्टोबर रोजी जळगाव एसीबीकडे दाखल करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी काव्यरत्नावली चौकात सापळा रचण्यात आला. खाजगी पंटर संतोष पाटील याने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने तत्काळ कारवाई करत तिघांनाही बेड्या ठोकल्या.
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, ग्रेडेडे पीएसआय सुरेश पाटील, नाईक बाळू मराठे, व कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.