भुसावळ शहरातील चमेली नगर परिसरातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीच्या गरबडीचा फायदा घेत भुसावळच्या चमेली नगर परिसरात चोरट्यांनी एका व्यापाऱ्याचे घर फोडून सुमारे ५ लाख ३२ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. घरमालक व कुटुंबीय दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीसाठी बाहेर गेल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला.
चौधरी यांचे दोन मजली घर चमेली नगर वांजोळा रोड येथे आहे. ते कुटुंबासह साने गुरुजी चौकात दुर्गामाता विसर्जन पाहण्यासाठी गेले होते. मध्यरात्री घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या पोर्चमध्ये काच फुटलेली दिसली. मुख्य दरवाज्याची कडीही कापलेली होती. घरात शिरल्यानंतर वरच्या मजल्यावरील हॉलचा काचा फोडलेला दरवाजा, आणि उघडी पडलेली लोखंडी कपाटे दिसून आली. कपाटातील रोख रक्कम आणि दागिने चोरट्यांनी चोरले होते. या प्रकरणी सचिन अनिल चौधरी (वय ३८, रा. चमेली नगर) यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ३ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम व दागिने असा सुमारे ५ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल लांबविला आहे.
घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, तसेच बाजारपेठ ठाण्याचे विजय नेरकर व सचिन चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. ठसेतज्ज्ञ आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी काचेचे तुकडे, बोटांचे ठसे आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासणे, गुप्त माहितीदारांची मदत घेणे, आणि परिसरातील संशयितांवर लक्ष ठेवले जात आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.