जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील घटना,नातेवाइकांचे ठिय्या आंदोलन
जामनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील हिवरखेडे बुद्रूक येथील प्रदीप कडू चांदणे (वय ३२) या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी चौकशीच्या मागणीसाठी नातेवाइकांनी ठिय्या आंदोलन केले. यानंतर तीन संशयितांविरुध्द जामनेर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
प्रदीप चांदणे यांची पत्नी मंगला प्रदीप चांदणे (२५, रा. हिवरखेडे बुद्रुक) यांनी फिर्याद दाखल केली आहे. मयत प्रदीप यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. मंगला चांदणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील काही जणांनी प्रदीप याला गुरुवारी रात्री घरून नेले. रात्री १२ वाजता संशयित आरोपी घरी आले व त्यांनी विचारले की प्रदीप घरी आला काय? यावर तुम्हीच त्यांना नेल्याचे मंगला हिने सांगितले. त्यावर संशयितांनी वाद घातला आणि धमकी दिली.
रात्री उशिरापर्यंत पती घरी न आल्याने मंगला यांनी शेजारी राहणारे गौतम लोखंडे यांना तपास करण्यास सांगितले. लोखंडे यांनी पाहणी करुन परत येऊन सांगितले की, प्रदीप याचा अपघात झाला आहे व उपचारासाठी जामनेरला नेण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी उपचार घेतांना प्रदीप याचा मृत्यू झाल्याचे समजल्याने त्याच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे.
संशयितांनीच पतीची हत्या केली असल्याचे मंगला चांदणे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी चांदणे याच्या नातेवाईकांनी जामनेर पोलिस ठाण्यासमोर रस्त्यावर ठाण मांडले. यामुळे काही वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला. फॉरेन्सिक पथक जामनेर येथे पोहचले आहे. त्यांच्याकडून तपास केला जात आहे. संशयित विनोद हरचंद महे, संतोष सोमा जोहरे व गणेश सुरेश काळे (सर्व रा. हिवरखेडे बुद्रुक) यांच्याविरुध्द जामनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील हे तपास करीत आहेत.