‘जीएमसी’मध्ये न्यायवैद्यकशास्त्र विभागातर्फे कार्यशाळा ; पोलीस, वकील डॉक्टरांना मार्गदर्शन
जळगाव (प्रतिनिधी) : कायदेशीर प्रकरणांमध्ये सुटसुटीतपणा असला तसेच न्यायप्रक्रियेमध्ये असणाऱ्या घटकांमध्ये योग्य सुसंवाद जुळून आला तर निश्चितच न्यायप्रक्रिया उत्तमरीत्या घडून येते. यामध्ये न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे योगदान महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागातर्फे सोमवार दि. २९ सप्टेंबर रोजी दिवसभराची “न्यायवैद्यकशास्त्र प्रकरणांमध्ये पोलीस दल, वैद्यकीय अधिकारी आणि वकील यांची भूमिका” याबाबत एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा न्यायालयातील न्या. पवन बनसोड, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील, न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. रमेश वासनिक, सहयोगी प्रा. डॉ. कपिलेश्वर चौधरी, आयोजन सदस्य सहा. प्रा. डॉ. शशिकांत ढोबळे उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन केले. यानंतर प्रस्तावनेमध्ये डॉ. रमेश वासनिक यांनी कार्यशाळा घेणेमागील भूमिका विषद केली. प्रसंगी न्यायालयीन प्रकरणांमध्ये असणाऱ्या त्रुटी आणि विविध बाबी या न्यायप्रक्रियेतील सर्व घटकांना माहीत असणे महत्त्वाचे ठरते असे प्रतिपादन न्यायमूर्ती पवन बनसोडे यांनी केले तर पोलिसांना व्यवस्थित माहिती मिळाली तर कायदेशीर गुन्ह्यांमध्ये कागदपत्र अचूक जमा करता येतात असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीदेखील, कार्यशाळा घेतल्याबद्दल कौतुक करीत न्यायप्रक्रिया जलद होण्यासाठी या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रयत्न होतील असे सांगितले. तर महाविद्यालयातील विविध विभागांच्या वतीने यापुढे देखील उत्कृष्ट कार्यशाळा या आयोजित होत राहतील अशी माहिती अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी दिली. या कार्यशाळेमधील सहभागी प्राध्यापक व डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलतर्फे २ क्रेडिट पॉईंट देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
सूत्रसंचालन डॉ. यशश्री तायडे व डॉ. निकिता अडकिने यांनी केले तर आभार डॉ. शशिकांत ढोबळे यांनी मानले. यावेळी कार्यशाळेचा २२५ पोलीस, वैद्यकीय अधिकारी, अंतरवासिता विद्यार्थी तसेच वकिलांनी लाभ घेतला. कार्यशाळेसाठी न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. दीपक सिंग, डॉ. निकिता अडकिने, डॉ. केदार असोलकर, डॉ. यशश्री तायडे, डॉ. ऋतुजा पवार, डॉ. सुमित प्रधान यांनी परिश्रम घेतले.
कार्यशाळेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन
या कार्यशाळेमध्ये न्यायालयीन प्रकरणात कागदपत्रांची पूर्तता याबाबत डॉ. शशिकांत ढोबळे यांनी मार्गदर्शन केले तर पोलिसांनी रेकॉर्ड कसे ठेवावे तसेच माहिती पोलिसांनी कशी जमा करावी याबाबत डॉ. रमेश वासनिक यांनी सांगितले. तसेच विविध विषयांवर नंदुरबार जीएमसी येथील डॉ. निलेश तुकाराम, जीएमसी, छत्रपती संभाजी नगर येथील डॉ. राधे खेत्रे, परभणी येथील वरिष्ठ वकील अॅड. विजय अडकिने, जळगावचे सहयोगी प्रा. डॉ. कपिलेश्वर चौधरी यांनी विविध विषयांवर दिवसभरात मार्गदर्शन केले. कार्यशाळेत न्यायालयीन प्रकरण सादर करताना येणाऱ्या त्रुटी, अडचणी याबाबत पोलिसांसह वकिलांनी माहिती जाणून घेतली. तसेच प्रश्नोत्तराद्वारे सहभाग घेत काही सूचना देखील केल्या. वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस तसेच वकील आणि पोलीस यांच्यामधील सुसंवाद हा अतिशय चांगला राहिला पाहिजे. त्यातूनच न्यायालयीन प्रकरणे सोप्या पद्धतीने सादर होऊ शकतात, असे कार्यशाळेत सांगण्यात आले.