जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. या संदर्भात रविवारी २८ सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
कल्पना सुनील लखोटे (वय-५९, रा. माळी गल्ली, जामनेर) या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. दि. २४ सप्टेंबर रोजी त्या जळगाव शहरात कामाच्या निमित्ताने आलेल्या होत्या. त्यांचे खाजगी काम आटोपून सायंकाळी ५ वाजता नवीन बसस्थानक येथे जामनेरला जाण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची सोनसाखळी चोरून नेली. गळ्यातील सोनसाखळी चोरून नेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी या परिसरामध्ये सर्वत्र शोध घेतला. अखेर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दिली. त्यानुसार रविवारी २८ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक राजेश पदमर करीत आहे.