जामनेर शहरातील घटना, शेळीचा होरपळून मृत्यू
जामनेर (प्रतिनिधी) : शहरातील बोदवड रस्त्यावर आज सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास वाहनात गॅस भरतांना मोठा स्फोट झाला आहे या स्फोटामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून एका शेळीचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. जामनेर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपासाला सुरुवात केली आहे.
जामनेर शहरात बोदवड रस्त्यावर सलीम शेख यांचे गॅरेज आहे. त्या गॅरेजमध्ये अवैध गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या ठिकाणी सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास वाहनांमध्ये गॅस भरला जात असताना गॅस लिक झाल्यानंतर ७ ते ८ गॅसहंड्याचे मोठे स्फोट झाले. या स्फोटामध्ये ओमनी कार आणि दुचाकी जळून खाक झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
तसेच परिसरात असलेली एक शेळी होरपळून तिचा मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांनी जामनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. तसेच जामनेर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. निरीक्षक मुरलीधर कासार यांनी स्वतः घटनास्थळी येऊन पाहणी करत माहिती जाणून घेतली. याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते. हे गॅरेज मोकळ्या जागेत असल्यामुळे या ठिकाणी मोठी जीवित हानी टळली आहे.