शिक्षण विभागातर्फे पाचोर्यात शैक्षणिक परिसंवाद उत्साहात
पाचोरा ( प्रतिनिधी ) – येथील पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे “चला निपुण विद्यार्थी घडवुया” या विषयावर शैक्षणिक परीसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादासाठी वाबळेवाडी व जालिंदर नगर, पुणे येथील आंतरराष्ट्रीय शाळा पाहण्यासाठी अभ्यास दौऱ्याला गेलेले शिक्षक,प्रत्येक केंद्रातील दोन उपक्रमशील शिक्षक, केंद्रप्रमुख आणि तालुका गुणवत्ता कक्षाचे सर्व सदस्य सहभागी होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पाचोरा गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे शापोआ अधीक्षक सरोज गायकवाड, समाधान पाटील, संजीव ठाकरे, केंद्र प्रमुख अभिजित खैरनार, शांताराम वानखेड़े, एकनाथ पाटील, जितेंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाचोळे, शिक्षक सेनेचे राजेंद्र पाटील, गुणवत्ता कक्षाचे दीपक परदेशी तसेच मुख्याध्यापक संघाचे किरण पाटील इत्यादी उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगतात विजय पवार यांनी सांगितले की, जालिंदर नगर आणि बाबळवाडी सारख्या शाळा घडवायच्या असतील तर आपले सर्व विद्यार्थी हे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये निपुण करावे लागतील. विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर पडताळणी करुन विद्यार्थी निहाय गुणवत्ता वाढीसाठी कृति आराखडा तयार करण्याचे आवाहन त्यांनी शिक्षकांना केले. जालिंदर नगर शाळेविषयी शिक्षक देवेंद्र पाटील यांनी माहिती दिली. वाबळेवाडी शाळेची वैशिष्ट्ये शिक्षिका प्राजक्ता जळतकर यांनी विषद केली.
योगेश जाधव आणि प्रतिभा उबाळे यांनी विद्यार्थी विकासासाठी अभ्यास दौऱ्याचा उपयोग कसा करता येईल याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाईदास सोमवंशी यांनी केले.सुत्र संचलन स्वाती पाटील यांनी केले तर आभार अरुण कुंभार यांनी मानले. या शैक्षणिक परिसंवादाच्या यशस्वीतेसाठी गटसाधन केंद्राचे गिरीश भोयर, अभिजीत खैरनार, सर्व बीआरसी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर शैक्षणिक परिसंवाद केंद्र स्तरावरही घेण्याचे यावेळी ठरले.