रावेर : तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान
चंद्रकांत कोळी
रावेर ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्याला ‘केळीचा जिल्हा’ म्हणून ओळखले जाते, पण या जिल्ह्यातील रावेर, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये खरीप हंगामातील कापूस आणि कडधान्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यावर्षी सुरुवातीला ही पिके चांगली बहरली होती, त्यामुळे शेतकरी आनंदात होते. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सततच्या पावसामुळे कापसाच्या पिकांवर लाल्या आणि अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे हिरवेगार आणि डोलणारे कापसाचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. त्याचप्रमाणे, उडीद, सोयाबीन, तूर, मूग आणि चवळी यांसारखी कडधान्येही अतिपावसाने खराब झाली आहेत. शेतकऱ्यांनी महागडी रासायनिक खते, बियाणे आणि औषधे विकत घेऊन ही पिके उभी केली होती. यासाठी त्यांनी राष्ट्रीयीकृत बँका आणि खासगी सावकारांकडून मोठी कर्जे घेतली होती. आता पिकांचे नुकसान झाल्यामुळे ही कर्जे कशी फेडायची, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.