सावध राहण्याचे जळगाव जिल्हा कोषागारातर्फे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा कोषागारामार्फत निवृत्तीवेतन धारक यांना निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात. जिल्हा कोषागार कार्यालयाच्या नावाने बनावट पत्रे व दूरध्वनी संदेशाद्वारे काहीजण निवृत्तीवेतनधारकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांनी अशा निनावी पत्रे किंवा फसव्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार व अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) सुभाष गुंजाळ यांनी केले आहे.

निनावी पत्रामुळे किंवा दुरध्वनी संदेशान्वये आर्थिक व्यवहार होऊन फसवणूक झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतनाबाबत काही शंका, समस्या असल्यास प्रथमतः कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार व अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) सुभाष गुंजाळ यांच्याकडून प्रसिद्धीपत्राद्वारे करण्यात आले आहे.









