मुक्ताईनगरमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली पाहणी
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुऱ्हा-काकोडा आणि पारंबी परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी, १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता थेट बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आणि लवकरच आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
या दौऱ्यात त्यांच्यासोबत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा-काकोडा, पारंबी या गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, मका, आणि केळी यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या नुकसानीची पाहणी करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या. त्यांनी तातडीने पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आणि कोणत्याही परिस्थितीत पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळेल, अशी ग्वाही दिली. ‘शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,’ असे ते म्हणाले.
या ढगफुटीसदृश पावसामुळे परिसरातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात वाहून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेची नोंद घेत शासनाने त्या तरुणाच्या कुटुंबाला तात्काळ चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून, ती त्वरित देण्यात आली. या वेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कुऱ्हा-काकोडा गावातील कमी उंचीच्या पुलाचाही प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. ‘या पुलाची उंची वाढवून नवीन पूल बांधण्यासाठी डीपीडीसीच्या माध्यमातून लवकरच निविदा काढण्यात येईल आणि या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल,’ असेही त्यांनी सांगितले.