भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगीरी
भुसावळ (प्रतिनिधी) : येथील भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे एका मोटारसायकल चोराला मध्य प्रदेशमधील बऱ्हाणपूर येथून अटक केली आहे. या संशयित आरोपीकडून चोरीच्या ३ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत २,२५,००० रुपये आहे. या कारवाईमुळे भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल असलेले मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

भुसावळ येथील पांडुरंगनाथ नगर येथे राहणारे सुनील पांडुरंग इंगळे यांची बुलेट मोटारसायकल चोरी झाली होती. याबाबत त्यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना, पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, बुलेट चोरीचा संशयित आरोपी बऱ्हाणपूर येथे आहे. डी.बी. पथकाने तात्काळ बऱ्हाणपूर येथे जाऊन आरोपी अरशद खान अहमद खान (वय २२, रा. खाजा नगर, आझाद नगर, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने आपल्या अल्पवयीन साथीदारासह मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी संशयित आरोपीकडून एकूण ३ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. यात चोरी झालेल्या रॉयल एनफिल्ड बुलेट (क्र. एमएच १९ ईडी ७६५०) तसेच बजाज कंपनीची प्लॅटीना (क्र. एमएच-१९-डीएस ३७२२) आणि एक लाल रंगाची नंबर नसलेली बजाज सी.टी. १०० मोटारसायकल यांचा समावेश आहे. या वाहनांची एकूण किंमत २,२५,००० रुपये आहे. ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखालील डी.बी. पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, उपनिरीक्षक मंगेश जाधव यांच्यासह विजय नेरकर, कांतीलाल केदारे, किरण धणगर, रविंद्र भावसार, सुनील सोनवणे, सचिन चौधरी, हर्षल महाजन, जीवन कापडे, महेंद्र पाटील, जावेद शहा, भुषण चौधरी, अमर अढाडे, प्रशांत सोनार, योगेश माळी, योगेश महाजन आदींनी ही यशस्वी कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार विजय बळीराम नेरकर करत आहेत.









