रावेर तालुक्यात खिर्डी येथे ईद-ए-मिलाद उत्साहात, शांततेत साजरी
रावेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील खिर्डी येथे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीने खिर्डी गाव उत्साहात न्हाऊन निघाले. मिरवणुकीनंतर ‘या अल्लाह जगात शांतता नांदू दे, देशात एकात्मता नांदू दे, देश महासत्ता होऊ दे’ अशी प्रार्थना समाजबांधवांनी केली. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम समाजाचा एक पवित्र सण मानला जातो. यानिमित्त सुन्नी जामा मस्जिद आणि अहेले सुन्नत वल जमाअत, खिर्डी यांच्यातर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ९ वाजता खिर्डी येथील जामा मशिदीतून मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक खिर्डी बुद्रुकमधील विविध कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, नवीन प्लॉट आणि गावातील मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आली. तसेच, हजरत कादरी शाह बाबा दर्गा आणि खिर्डी खुर्दमधील मुस्लिम वस्त्यांमधून जाऊन गावाच्या मुख्य प्रवेशद्वारातून पुन्हा नवीन प्लॉट आणि टॉवरमार्गे जामा मशिदीजवळ तिचा समारोप करण्यात आला.
मिरवणुकीच्या मार्गावर विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले आणि गोड पदार्थांचे वाटपही करण्यात आले. मिरवणुकीत सहभागी झालेले समाज बांधव घोषणा देत होते, तर ध्वनीक्षेपकावरून नातपाक व सलातो सलामचे पठण सुरू होते. या मिरवणुकीसाठी निंभोरा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.