जळगाव शहरातील घटना, गुन्हा दाखल
शहरातील रहिवासी आणि हॉलीडे टूर ऑपरेटर असलेले राजेश ओमप्रकाश मलिक यांना शालीनी गौडा नामक महिलेने ‘ऑप्टिनेक्स मार्केट्स’ नावाच्या ऑनलाइन ट्रेडिंग कंपनीची माहिती दिली. ऑप्टीनेक्स या वेबसाइटवर गुंतवणूक केल्यास कमी वेळात मोठा परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखवण्यात आले. सुरुवातीला या बोलण्यावर विश्वास ठेवून राजेश मलिक यांनी भरलेल्या रक्कमेवर ४ हजार ५६० रुपयांचा अधिकचा नफा मिळाला, त्यामुळे मलिक यांचा विश्वास त्यांनी संपादन केला.
त्यानंतर, अधिक नफ्याच्या आशेने त्यांनी ७ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान टप्प्याटप्याने तब्बल ४५ लाख रुपये ऑनलाईन भरले. मात्र, ही रक्कम परत मिळाली नाही आणि आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या गंभीर प्रकारानंतर राजेश मलिक यांनी ३ सप्टेंबर, बुधवारी सायबर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम ४२० आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे पुढील तपास करत आहेत.