सततच्या पावसामुळे रावेरमधील केळी उत्पादक संकटात
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : केळीचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रावेर, यावल, मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. आधीच पूर आणि वादळाच्या तडाख्यातून वाचलेल्या केळीच्या बागा आता जागेवरच पिकू लागल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उभ्या असलेल्या बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. दरवर्षी हा आजार काही प्रमाणात दिसून येतो, परंतु यावर्षी त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. यामुळे संपूर्ण बागांमध्ये पिकलेल्या केळीचा वास येऊ लागला आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत रावेरच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे शासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावं, अशी मागणी होत आहे.
अनेक संकटांनी हतबल झालेल्या शेतकऱ्यांपुढे आता हे नवं संकट उभं राहिल्यामुळे त्यांचं आर्थिक गणित पूर्णपणे बिघडलं आहे. यामुळे कर्जाचा डोंगर माथी बसण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.