पोलिसांनी केला ६ लाख ८३ हजार २४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित पान मसाला आणि इतर अन्नपदार्थांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोवर चाळीसगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ लाख ८३ हजार २४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चाळीसगाव शहर पोलिसांना अवि रेखा पेट्रोलपंपा समोर, नागदरोड येथे एक संशयित टेम्पो (क्र. एमएच १९ सीवाय ६६५२) थांबवून तपासणी केली. त्यावेळी, या टेम्पोत ‘सुगंधित पान मसाला’, ‘कुरकुरे’ आणि ‘पोंगा पंडित’ यांसारखे शासनाने प्रतिबंधित केलेले पदार्थ आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गाडीसह हा सर्व मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाचा पंचनामा अन्न व औषध प्रशासन, जळगाव विभागाचे अधिकारी शरद मधुकर पवार आणि श्रेणी कैलास पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, पोहेकॉ योगेश मांडोळे, पोहेकॉ योगेश बेलदार, पोहेकॉ राकेश पाटील, पोना नितीन आगोणे, पोकों निलेश पाटील आणि पोकों ज्ञानेश्वर पाटोळे यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भारत चौधरी करत आहेत.