पाचोऱ्यात तहसीलदारांच्या लॉगिन आयडी, पासवर्डचा गैरवापर
पाचोरा ( प्रतिनिधी ) – खरीप हंगामातील नुकसान भरपाई अनुदानाची १ कोटी २० लाख रुपयांची रक्कम पाचोरा तहसील कार्यालयातील सहायक लिपिकासह एका प्रशिक्षणार्थीने परस्पर बोगस लाभार्थ्याच्या नावे नोंदवून अपहार केला. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक लिपिक अमोल सुरेश भोई (२८, रा. पाचोरा) आणि युवा प्रशिक्षणार्थी गणेश हेमंत चव्हाण (२२, रा. कृष्णापुरी, पाचोरा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राज्य शासनाकडून नैसर्गिक आपत्तीमुळे २०२२-२३ व २०२४-२५ या दोन वर्षात बाधित एकूण ३४७ शेतकऱ्यांसाठी भरपाईची रक्कम आली होती. मात्र बनावट याद्या तयार करुन ही रक्कम पात्र नसलेल्या तसेच शेती नावावर नसलेल्या व्यक्तींच्या नावावर टाकण्यात आली. पुढे बनावट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम परस्पर काढून ती स्वतःसाठी वापरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत बनावट दस्ताऐवज तयार करून ते पंचनाम्यात जोडण्यात आले. यात शासकीय कर्मचारी व लोकप्रतिनिधींच्या भरपाईचे अनुदान खात्यात जमा होत नसल्याबाबत गेल्या महिन्यात शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या.
त्यानंतर लाभार्थ्यांची मूळ यादी ग्रुपवर पाठवताच अमोल भोई याने संबंधित लिपिकाला यादी अपलोड करू नका, माझ्याकडे मूळ यादी आहे.ती टाकतो, असे सांगितले. मात्र, त्याचे न ऐकता संबंधित लिपिकाने यादी अपलोड केली. आंबेवडगाव येथील तलाठी यांनी यादीची प्रत चावडीवर लावली. यावर लाभार्थ्यांची नावे आणि आधार नंबर वेगळाच असल्याचे निदर्शनास आले. त्यांचे पैसे अन्य गावातील लोकांना दिल्याचे आढळले. सर्वच गावांमधील यादीची छाननी करण्यात आली. त्यातून मोठा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले. भोई यास चौकशीसाठी बोलावले असता त्याने या अफरातफरीची कबुली दिली आहे. याबाबत चौकशी सुरू आहे, अशी माहिती तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिली.
प्रकरणात बनावट स्वाक्षऱ्याही आढळल्या आहेत. तहसीलदारांचा लॉग इन आयडी व पासवर्डचा दुरूपयोग करण्यात आला. अपहाराची रक्कम तब्बल १ कोटी २० लाख १३ हजार रुपये एवढी आहे. याबाबत पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी फिर्याद दिली.