यावल पोलीस स्टेशनची कारवाई
यावल (प्रतिनिधी) :- रावेर ते चोपडा राष्ट्रीय महामार्गावर यावल शहरातील बुरुज चौकाजवळ दुचाकीस्वार तरूणाला अज्ञात दरोडेखोरांनी जीवे ठार मारण्याचा धाक दाखवत रोकडसह कागदपत्रे लुटली होती. या प्रकरणात २ संशयितांना यावल पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रावेर ते चोपडा राष्ट्रीय महामार्गावर यावल शहरातील बुरुज चौकाजवळ दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास एका चालकावर दरोडा टाकून रोकडसह कागदपत्रे लुटल्याची घटना घडली. रोहित प्रकाश रल (वय २४, रा. चोपडा) हे आपल्या महिंद्रा पिकअप गाडीतून जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे वाहन थांबवले. त्यांना मारहाण करून गाडीच्या डॅशबोर्डमधील पिशवीतील रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे जबरीने काढून घेतली. या घटनेनंतर तात्काळ यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तातडीने सूचना दिल्या. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आणि परिसरातील स्थानिकांच्या चौकशीतून पोलिसांनी तपास सुरू केला. या गुन्ह्यात समशेर शहा सलीम शहा (वय २७, रा. यावल) आणि त्याचा साथीदार समीर रहेमान तडवी (वय २२, रा. यावल) यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी समशेर शहा यास जळगाव येथील गेंदालाल मिल परिसरातून आणि त्याचा साथीदार समीर यास यावलमधून ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी चोरीस गेलेली ५,००० रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे.
यातील मुख्य आरोपी समशेर शहा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्यात चोरीचे तर बाजारपेठ पोलिस ठाण्यात जबरी चोरी, घरफोडी आणि विनयभंग अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, पोलीस हवालदार वासुदेव मराठे, निलेश चौधरी, पोलीस नाईक अमित तडवी, पोलीस कॉन्स्टेबल अर्षद गवळी, ऐजाज गवळी, अनिल साळुंखे आणि सागर कोळी यांनी ही यशस्वी कारवाई केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.