गोदावरी इग्लीश स्कुल जळगाव,डॉ उल्हास पाटील स्कुल सावदा भुसावळातील कलाकारांचा सहभाग
जळगाव (प्रतिनिधी) :- पर्यावरण रक्षण, नैसर्गिक गणेशोत्सव, पाण्याचे प्रदूषण आणि पारंपरिकतेचा गणेश उत्सवाचा संदेश देणारा सामाजिक आशय असलेला ‘ते दहा दिवस’ हा मराठी चित्रपट स्वच्छ पाण्याची चळवळ असल्याचे प्रतिपादन लेखक दिग्दर्शक भारत वाळके यांनी आज केले.विशेष म्हणजे यात स्थानिक कलावंतांना सोबत घेवून चित्रपट पुर्ण करण्यात आला आहे.
प्रिमीयर शोच्या निमीत्ताने ते पुढे बोलतांना म्हणाले की जळगाव, भुसावळ, फैजपूर मध्ये प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. गणपती बाप्पांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर या चित्रपटाची चर्चा रंगत असून,देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यावरण विषयक संदेशावर आधारित या चित्रपटात, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणार्या पाणी प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर नैसर्गिक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करत, चित्रपट एक सकारात्मक पर्यावरणीय संदेश देतो.
‘चला संकल्प करूया पर्यावरण रक्षणाचा, चला संकल्प करूया नैसर्गिक गणेश उत्सवाचा’, या घोषवाक्यांसह चित्रपटाची मांडणी जनतेच्या मनाला भिडतेय. राघव फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि बंधन प्रोडक्शनच्या सहनिर्मितीत तयार झालेल्या या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आहेत भारत वाळके. डीओपी व एडिटिंगची जबाबदारी योगेश ठाकूर यांनी समर्थपणे सांभाळली आहे. संपूर्ण चित्रीकरण जळगाव, सावदा, विवरा,बोदवड येथे करण्यात आले आहे. त्यामुळे ‘ते दहा दिवस’ हा जळगावकरांसाठी अभिमानाचा विषय ठरत आहे.जळगाव, भुसावळ, फैजपूर येथील चित्रपट गृहांमध्ये या चित्रपटाने चांगली गर्दी खेचली असून, चित्रपट संपल्यानंतर लेखक-दिग्दर्शक भारत वाळके स्वतः विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत आहेत. पर्यावरणावर चर्चा करत ते विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणासाठी कृतीशील होण्याची प्रेरणा देत आहेत. या उपक्रमामुळे चित्रपट फक्त मनोरंजनापुरता न राहता, तो एक सामाजिक चळवळ बनू लागला आहे.या चित्रपटासाठी गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व डॉ. केतकीताई पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्यांच्या पाठबळामुळे ‘ते दहा दिवस’ या चित्रपटाचा संदेश अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचू शकला असून जळगाव येथील गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल,डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ,डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल,सावदा या शाळांचे मोठे योगदान ठरले आहे.या चित्रपटा संदर्भात बोलतांना चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक भारत वाळके यांनी हा चित्रपट जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पाहून समाजाच्या तळागाळापर्यंत स्वच्छ पाणी आणि पर्यावरण रक्षणाची जागृती करावी असे आवाहन केले आहे.