जिल्ह्यात खूनसत्र सुरूच ; पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोहारा येथे गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात चारित्र्याच्या संशयावरून पतीने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दि. १९ ऑगस्ट रोजी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक करण्यात आली आहे.

संशयित आरोपी नितीन दौलत शिंदे (वय ३५, रा. पाचोरा रोड, राममंदिरा समोर, लोहारा ता.पाचोरा) याला अटक झाली आहे. तर अर्चना उर्फ कविता नितीन शिंदे (वय ३२) असे मयत पत्नीचे नाव आहे. त्यांच्या पश्चात १ मुलगा व १ मुलगी असा परिवार आहे.(केसीएन)याबाबत मयताचा भाऊ आकाश कडूबा सपकाळ (रा. शिवणा या.सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर) याने माहिती दिली की, माझी बहिण अर्चना उर्फ कविता शिंदे हिची सासु व पती नितीन शिंदे हे चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण व शिवीगाळ करीत होते. तसेच तुझ्या माहेरच्या लोकांनी जमीन विकलेली आहे.
त्यांच्याकडून घर बांधण्यासाठी १० लाख रुपये मागत होते आणि सतत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मानसिक व शारीरिक छळ करीत होते. मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पत्नी अर्चना उर्फ कविता शिंदे गाढ झोपेत असताना चारित्र्याच्या संशयावरून पती नितीन शिंदे यांने घातक शत्र्यांने वार करून हत्या केली.(केसीएन)घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक अरुण आव्हाड, स.पो.नि. कल्याणी वर्मा यांचेसह पोलीस यंत्रणा आली. सदर मयताचा पती नितीन शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.जिल्ह्यात सतत खुनाच्या घटना घडत असल्याने समाजमन सुन्न झाले आहे.