मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा येथील घटना
मुक्ताईनगर प्रतिनिधी : तालुक्यातील लालगोटा येथे मंदिरात मूर्ती ठेवण्याच्या वादातून भाऊबंदकी उफाळल्याने एका प्रौढाच्या डोक्यात कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना दि. १७ रोजी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान घडली. याप्रकरणी ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
राणा मनमौजदार पवार (वय ४५) असे मयत प्रौढाचे नाव आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा येथे ते परिवारासह राहत होते.त्यांची पत्नी मीनाक्षी राणा पवार यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंदिरात देवीची मूर्ती ठेवण्याचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. या कारणावरून दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान लालगोटा गावात संशयित आरोपी गुरुदीप निलेश बाबू पवार, राजेंद्र बाबू उर्फ सिगरेट बाबू पवार, क्रिश राजेंद्र बाबू पवार, दीपक जिलेश बाबू पवार, जिलेश बाबू कोनाली पवार, शक्ती कपूर सिगरेट बाबू पवार, शिव कपूर शक्ती कपूर पवार, लताबाई शक्ती कपूर पवार, अनुलेखा दीपक पवार अशा ९ जणांनी राणा पवार (वय ४५) याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यात तो जागेवर बेशुद्ध पडला.
त्यानंतर त्याला दवाखान्यात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याला मृत घोषित केले. राणा मनमौजदार पवार याच्या खून केल्याप्रकरणी तसेच यात मीनाक्षी राणा पवार राजकुवर, राणा पवार धनकुवर, राणा पवार, सर्जेराव पवार, सरजू पवार, तसेच चोनीबाई पवार असे ६ जण गंभीर जखमी झाले. या कारणाने ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यापैकी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, तसेच फॉरेन्सिक टीम दाखल झाले होते. तपास पो.नि. आशिष आडसूळ तपास करीत आहेत.