जामनेर तालुक्यात गोद्री शिवारात घटना
जामनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील गोद्री शिवारातील कांग प्रकल्पाच्या उत्तरेस कांग नदी पात्रात दि. १ ऑगस्ट रोजी सकाळचे सुमारास मादी जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळला त्याचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाल्याचे पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून त्याच्या शरिराचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सीक लॅब मध्ये पाठविण्यात येणारे आहे. त्याचे वय अंदाजे ५ ते ६ वर्ष असल्याची माहिती वनविभागातर्फे देण्यात आली.
दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेचे सुमारास स्थानिक शेतकऱ्यांना कांग प्रकल्याच्या सांडव्यातील कांग नदीपात्रात बिबट्या मृत अवस्थेत आढळला त्यांनी ही माहिती गोद्री परिमंडळाचे वनपाल समाधान धनवट यांना दिली. त्यांनी वनरक्षक कुणाल जाधव व मंगेश निकम यांचे समवेत घटनास्थळ गाठले. पाहणी करून वनपरिक्षेत्र अधिकारी सूरज आवारे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी सूरज निकम, वनरक्षक मुकेश बोरसे, मीना कोकणे, पशुधन विकास अधिकारी डॉ. राहूल ठाकूर (शहापूर), डॉ. मंगेश टाक (वाकोद), डॉ. भारती कुरेल (फत्तेपूर) व रोहीदास चव्हाण (व्रण उपचारक) फत्तेपूर हे घटनास्थळी पोहचले. बिबट्या कुजलेल्या अवस्थेत असल्याने जागेवरच शवविच्छेदन करून त्याची शासकिय इतमामात विल्हेवाट लावण्यात आली. पुढील तपास उप वनसंरक्षक व सहाय्यक उपवनसंरक्षक जळगाव यांचे मार्गदर्शना खाली वनपरिक्षेत्र अधिकारी सूरज आवारे व वनपाल समाधान धनवट करीत आहे.