चेतना व्यसनमुक्ती केंद्रात आयोजन
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्रामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि विचारवंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथीनिमित्त उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. यावेळी ज्ञान वेद अबॅकसचे संचालक संदीप सोनार, ज्येष्ठ समाजसेवक अशोक भावसार, दूरदर्शन व टीव्ही कलावंत नितीन तायडे, तसेच चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. नितीन विसपुते आणि त्यांच्या सहकाऱ्यांची उपस्थिती लाभली.
मान्यवरांनी भाषणांतून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्यावर तसेच लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान योगदानावर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत व समाजसुधारक म्हणून टिळकांचे कार्य आजच्या पिढीस मार्गदर्शक असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. तर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि कार्यातून समाजातील वंचितांना नवा आत्मविश्वास दिला, त्यांचा संघर्ष आजही प्रेरणादायी असल्याचे विचार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतना व्यसनमुक्ती केंद्रातील कार्यकर्त्यांनी केले. शेवटी सर्व मान्यवरांनी व्यसनमुक्तीबाबत समाजात जनजागृती करण्याची आणि महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याची गरज अधोरेखित केली.