भडगाव येथील प्रकार, दोन्ही कुटुंबाचे झाले सरकारी समुपदेशन
पाचोरा (प्रतिनिधी) :- विवाह म्हटले तर लग्नपत्रिका आलीच. अशीच एक लग्नपत्रिका भडगावच्या तहसीलदार शीतल सोलाट यांना मुलाचा पिता देण्यासाठी आला. मात्र आमंत्रण स्वीकारताना तहसीलदारांना शंका आली. चौकशीत वधू व वर हे अल्पवयीन असल्याचे दिसून आले. नंतर पाचोरा येथे दोन्हीकडील कुटुंबाचे समुपदेशन करुन बालविवाह रोखण्यात आला आहे. मुलगा – मुलगी सज्ञान होत नाही तोपर्यंत विवाह करणार नाही असे वचन देखील त्यांच्याकडून घेण्यात आले.
भडगाव तालुक्यातील एका १८ वर्षाच्या मुलाचा विवाह पाचोरा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी ठरला होता. या विवाहाचे आमंत्रण मुलाच्या पित्याने भडगाव तहसीलदार शीतल सोलाट यांना दिले. तहसीलदारांना पत्रिका बघत असताना शंका आली. त्यांनी वधू व वराबाबत चौकशी केली. यावेळी त्यांना मुलगा आणि मुलगी दोन्हीही अल्पवयीन असल्याचे समोर आले. त्यानंतर लग्नाच्या या वऱ्हाडाची बैठक शुक्रवारी दि. २५ जुलै रोजी पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत दोन्ही कुटुंबाकडून मुलगा आणि मुलगी दोन्हीही सज्ञान होईपर्यंत विवाह करणार नाही, असे वचन घेण्यात आले.
नायब तहसीलदार रणजित पाटील, मंडळ पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, गटविकास अधिकारी के. बी. अंजने, अधिकारी वैशाली पाटील, ग्राम महसूल अधिकारी संभाजी पाटील, ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत सोमवंशी, तलाठी प्रियांका शिंदे, पोलिस पाटील वसंत बाविस्कर, पाचोरा बालविकास प्रकल्प अधिकारीचे प्रतिनिधी सुनीता पाटील, मनीषा पाटील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वधू-वरांच्या मातापित्यांना समुपदेशन करीत हा बालविवाह होणार नाही, याची माहिती दिली.