जळगावात दूरदर्शन टॉवर समोरील घटना ; ट्रकसह चालक ताब्यात
जळगाव (प्रतिनिधी) :- कामावरुन घरी जात असलेल्या प्रौढाच्या दुचाकीला मागून भरधाव ट्रकने चिरडले. ही घटना दि. २५ रोजी रात्री साडेआठ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील दूरदर्शन टॉवर समोर घडली. पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख हारुन शेख रशिद मणियार (वय ४४, रा. मणियार मोहल्ला नशिराबाद, ता. जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले आणि मुलगी असा परिवार आहे. शेख हारुन शेख रशिद मणियार हे जळगाव शहरातील नवीपेठेतील सायकल मार्टच्या दुकानावर कामाला होते.(केसीएन) दररोज ते नशिराबाद येथून (एमएच १९, सीक्यू ९७५८) क्रमांकाच्या दुचाकीने कामावर येत होते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावरुन आले आणि काम आटोपून ते सायंकाळी घराकडे दुचाकीवरून घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी त्यांना जळगावकडून भुसावळकडे (सीजी ०७, बीए ५०५३) क्रमांकाच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक देत चिरडले. शेख हारुन हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला होता.
अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.(केसीएन)तसेच पोलिसांनी दुचाकीस्वाराला चिरडणाऱ्या ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले. ट्रक देखील पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच शेख हारुन यांच्या नातेवाईकांसह मित्रांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात धाव घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.