प.पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा. यांचे मार्गदर्शन
जळगाव (प्रतिनिधी) :- प्रत्येकाच्या जीवनात गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरू ज्ञानदाता व जीवनाचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरूपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. चातुर्मासचे चार महिने मनाची मशागत करण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली असते. चातुर्मास काळात चार महिने देवी-देवता झोपी जातात. त्यामुळे आपण धर्मकार्यात स्वतःला गुंतवावे, असे आवाहन श्रमणी सूर्या राजस्थान प्रवर्तिनी महासतीजी डॉ. सुप्रभाजी म.सा. यांनी आजच्या प्रवचनातून केले. ‘चातुर्मास’ या शब्दाची फोड व या काळात सुश्रावक-सुश्राविकांनी काय करावे? काय करू नये? याबाबत प.पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा. यांनी सविस्तर समजावून सांगितले.
चातुर्मास शब्दाची फोड करताना नऊ शब्दांतून संदेश मिळतो: ‘च’ – चंचलता दूर करा, ‘आ’ – आत्म्यात रमा, ‘त’ – तपस्या करा, ‘उ’ – ज्ञानार्जनासाठी प्रत्येक क्षण उपयोगी करा, ‘र’ – रसनेंद्रियांवर विजय मिळवा, ‘म’ – ममत्व सोडा, ‘आ’ – आळस टाळा, ‘स’ – समभाव ठेवा, ‘अ’ – ब्रह्मचर्य पाळा. किमान एक तास जिनवाणी ऐकण्यासाठी द्यावा आणि आत्मोन्नतीकडे एक पाऊल वाढवा, असेही प.पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा. म्हणाल्या. भगवान अरिष्टनेमी यांचा द्वारकेत चातुर्मास होता. श्रीकृष्णाने त्यांना प्रश्न विचारला, “चातुर्मासात जैन साधू एकाच ठिकाणी का राहतात?” यावर अरिष्टनेमी म्हणाले, “पावसाळ्यात सूक्ष्म जीवांची निर्मिती होते. पावसाचे दोन महिने आणि वातावरण सुकण्यासाठी दोन महिने, अशा चार महिन्यांत साधू हिंसा टाळण्यासाठी स्थिर राहतात.” हे ऐकून त्याचक्षणी श्रीकृष्णानेही चार महिने स्थिर राहण्याचा संकल्प केला.
गुरूंची महती सांगताना डॉ. सुप्रभाजी यांनी तुलसीदासांचा ‘शीश दिया, गुरू मिले तो भी सस्ता दान!’ दोहा उद्धृत केला. यासोबत अख्यायिकाही सांगितली “जगात कोण मोठा?” प्रश्नाचे उत्तर समोर आले. पृथ्वी मोठी, पण ती शेषनागावर आहे. शेषनाग महादेवाच्या गळ्यात, महादेव पर्वतावर, पर्वत हनुमानाच्या हातात, हनुमान श्रीरामाच्या चरणी आणि श्रीराम गुरू वशिष्ठांच्या चरणी. म्हणून गुरु सर्वश्रेष्ठ आणि विशाल आहेत, असेही म्हटले जाते की, ‘मां जन्म देती है, तो गुरू जीवन देते है’। यावरून गुरूजनांच्या महतीची प्रचीती लक्षात यावी…