जळगावात फसवणुकीचे गंभीर प्रकरण
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील एका संस्थेची आणि बांधकामाची लाखो रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या संशयित आरोपी राजेश भरत जाधव याच्या विरोधात जानेवारी २०२३ पासून सातत्याने तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. रामानंद पोलीस स्टेशनमध्ये १६ डिसेंबर २०२४ रोजी एफआयआर (गुन्हा क्र. ०७३९) दाखल होऊनही, जवळपास सात महिने उलटूनही आरोपीवर कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोप तक्रारदार युवराज प्रकाश बारी यांनी केला आहे.
युवराज बारी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेसह पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी व विविध अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजेश भरत जाधव याने लाखो रुपयांची फसवणूक आणि नुकसान केले आहे. तक्रारदाराने अडीच वर्षांपासून सतत पाठपुरावा केला आहे. रामानंद पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव यांनी या प्रकरणात कोणतीही पुढील कार्यवाही केली नसल्याचे आणि आरोपीला पकडण्यात अपयश आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, तालुका पोलीस स्टेशनमधून तर या प्रकरणी कोणतीही कारवाई सुरुच झाली नसल्याचे दुर्दैवाने नमूद केले आहे.
तक्रारदाराने मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक आणि विभागीय आयुक्त यांच्या आदेशांचे व सूचनांचे पालन पोलीस अधीक्षक कार्यालय आणि रामानंद पोलीस स्टेशन करत नसल्याचा गंभीर आरोप केला आहे.
फसवणूक करणारा आर्किटेक्ट राजेश भरत जाधव याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत असून, खोटे अर्ज फाटे करून वेळोवेळी तक्रार दाबण्याचा आणि केस बंद करण्याचा प्रयत्न रामानंद पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून झाल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. केवळ नावाला गुन्हा दाखल होतो, पण न्याय मिळत नाही, हे यातून सिद्ध होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.या प्रकरणी रामानंद पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जालाही दाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. वरिष्ठ अपिलीय प्राधिकारी तथा उप-विभागीय पोलीस अधिकारी, जळगाव यांनी माहिती देण्याचे आदेश देऊनही, जनमाहिती अधिकारी रामानंद पोलीस स्टेशन यांनी गेल्या सहा महिन्यांपासून माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे.
या सर्व प्रकारामुळे आपले मानसिक संतुलन बिघडले असून मानसिक त्रास वाढला असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. त्यांना न्याय मिळेल की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचे त्यांनी व्यक्त केले आहे. फसवणूक करणारा आर्किटेक्ट राजेश भरत जाधव या फरार आरोपीला पकडून त्याच्यावर पारदर्शक आणि योग्य कार्यवाही कधी होणार, यासाठी अजून किती वेळ लागेल, याचा लेखी खुलासा रामानंद पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाने द्यावा, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. तसेच, या प्रकरणाची चौकशी समिती बसवून, कामात दिरंगाई आणि कामचुकारपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. एफआयआरनुसार होणाऱ्या सर्व चौकशीचे, तसेच आरोपी राजेश भरत जाधव आणि इतर सर्व लोकांचे स्टेटमेंट समोरासमोर व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.