पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवारातील घटना
पारोळा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सुमठाणे शिवारात एका ४५ वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून करीत जंगलात फेकल्याची धक्कादायक घटना दि. २५ रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अमळनेर पोलिसांच्या पथकाला माहिती मिळाल्यावर त्यांनी पारोळा पोलिसांना माहिती दिली. पारोळा पोलिसांनी महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.
तालुक्यात जानवे सुमठाणे शिवारात एका गोणीत कोणाला तरी बांधून फेकले असल्याची माहिती अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना मिळाली होती.(केसीएन)त्यांनी त्यांचे कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, अमोल पाटील, गणेश पाटील, प्रशांत पाटील, उज्वलकुमार म्हस्के, सागर साळुंखे आदि पोलिसांना घटनास्थळी पाठवले. पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवारात जंगलात एका ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. तिच्या डोक्यात दगड टाकून खून करीत खतांच्या गोणीत बांधून फेकून दिले होते. पुरावा मिळू नये म्हणून त्या गोणीवर पालापाचोळा झाकलेला होता.
हा प्रकार दोन दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अमळनेर पोलिसांनी रात्री पारोळा पोलिसांना ही माहिती देऊन मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. दरम्यान, पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(केसीएन)दरम्यान, सदर महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले असून माहिती असल्यास पारोळा पोलीस स्टेशन येथे निरीक्षक सचिन सानप, एपीआय चंद्रसेन पालकर यांचेशी संपर्क करा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी केले आहे.