पाचोरा शहरात घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- पाचोरा शहरात असलेल्या सुपडू भादू पाटील शाळेत शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शाळेतील चौथ्या मजल्यावरील एका खोलीत आज दि. २५ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आले. पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रविंद्र भारत महाले (वय ३६, रा. दहिगाव संत हल्ली मु. पाचोरा)असे मयत शिक्षकाचे नाव आहे. पाचोरा शहरातील एका शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, आज दि. २५ जून रोजी सकाळी दहा वाजेच्या वाजेच्या सुमारास रविंद्र महाले यांनी शाळेतील एका वर्गखोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.(केसीएन)घटनेची माहिती समजताच शाळेतील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती दिली. यानंतर पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत सदर घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नसून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोरा ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, सहकारी शिक्षकांमध्ये शोककळा पसरली आहे.