मुक्ताईनगर तालुक्यात बऱ्हाणपूर रस्त्यावर कारवाई, माजी नगरसेवकासह दोघे फरार
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नाशिक येथील गुप्त वार्ता पथकाने मुक्ताईनगर येथे धडक कारवाई करत, प्रतिबंधित असलेला तब्बल १४ लाख १६ हजार रुपये किमतीचा गुटखा, विमल पान मसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी नगरसेवक बबलू कोळी यांचे नाव समोर आले आहे. बऱ्हाणपूर-मुक्ताईनगर रोडवरील पूर्णा नदी पुलाजवळ ही कारवाई करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासन, गुप्त वार्ता विभाग, नाशिक यांना प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने बऱ्हाणपूर-मुक्ताईनगर रोडवर पाळत ठेवली. (एमएच २० डीएफ ५७९७) या क्रमांकाच्या टाटा इनोव्हा वाहनाचा पाठलाग करून पथकाने ते ताब्यात घेतले.(केसीएन)वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये ८ लाख १६ हजार रुपये किमतीचा विमल पान मसाला आणि व्ही-१ सुगंधी तंबाखूचा मोठा साठा आढळून आला आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या साठ्यासह, अंदाजे ६ लाख रुपये किमतीचे टाटा इनोव्हा वाहन देखील जप्त करण्यात आले आहे. अशाप्रकारे, एकूण १४ लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी बबलू कोळी (रा. मुक्ताईनगर), अनुपम गोसावी आणि मध्य प्रदेशातील इच्छापूर येथील पुरवठादार यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संशयित बबलू कोळी हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी नगरसेवक असल्याची माहिती समोर येत आहे. तिघेही आरोपी हे फरार झाले आहे. अन्नसुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) अविनाश दाभाडे (नाशिक) आणि अन्नसुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर (जळगाव) यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. महाराष्ट्रात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री आणि वाहतुकीवर बंदी असतानाही असे पदार्थ मोठ्या प्रमाणात विकले जात असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आले आहे.